नवी मुंबईत जागतिक दर्जाचे शिक्षण: 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उभारणार
नवी मुंबईत जागतिक दर्जाचे शिक्षण: 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उभारणार
नवी मुंबईतील ‘एज्युसिटी’ प्रकल्पाला मोठे यश मिळाले असून, पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना त्यांचे कॅम्पस स्थापन करण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LOI) प्रदान करण्यात आले आहे. यामुळे नवी मुंबई जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या माध्यमातून भारताने जगातील सर्वोत्तम विद्यापीठांसाठी आपले दरवाजे खुले केले असून, या ऐतिहासिक पावलामुळे भारतीय विद्यार्थ्यांना स्वदेशातच कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लवकरच आणखी 5 परदेशी विद्यापीठे येथे कॅम्पस सुरू करतील, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे ठळक मुद्दे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत मुंबईतील ‘ताज हॉटेल’ येथे आयोजित ‘मुंबई रायझिंग: क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या कार्यक्रमात या पाच विद्यापीठांना LOI प्रदान करण्यात आले. यावेळी NMIMS विद्यापीठाच्या MPSTME आणि NMIMS इमारतींचे उद्घाटन तसेच SVKM शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी NMIMS विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अमरीश पटेल यांचे कौतुक करताना सांगितले की, “डॉ. पटेल यांनी मूल्यांशी तडजोड न करता ही संस्था घडवली, म्हणूनच आज NMIMS देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये क्रमांक एकवर आहे.”
आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची यादी
या पाच विद्यापीठांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ अॅबरडीन (स्कॉटलंड), यॉर्क विद्यापीठ (यूके), वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका) आणि इस्तितुतो युरोपियो डी डिझाईन (इटली) यांचा समावेश आहे. ही विद्यापीठे संगणक विज्ञान, अभियांत्रिकी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, फॅशन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, बिझनेस आणि STEM क्षेत्रात पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रम ऑफर करतील.
जागतिक शिक्षणाची संधी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भारतात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढले आहे. यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतातच 25-33% खर्चात जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल. यामुळे परकीय चलनाची बचत होईल आणि विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण परवडत नसल्याने मागे राहण्याची वेळ येणार नाही.” यामुळे नवी मुंबईतील ‘एज्युसिटी’ एक व्यापक शैक्षणिक परिसर म्हणून आकार घेईल, जिथे मेडिसिटी, इनोव्हेशन सिटी आणि स्पोर्ट्स सिटीचाही विकास होणार आहे.
शिक्षणात लवचिकता आणि स्पर्धा
फडणवीस यांनी शिक्षणातील बदलांवर भर देताना सांगितले, “पूर्वी शैक्षणिक व्यवस्था ‘स्टॅटिक’ होती, अभ्यासक्रम बदलण्यास विलंब लागायचा. आता NEP मुळे शिक्षण ‘डायनॅमिक’ झाले आहे. मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञान-केंद्रित शिक्षणामुळे उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल.” त्यांनी स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले, “आता भारतीय संस्थांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी स्पर्धा करावी लागेल. ही स्पर्धा आपल्याला अधिक सक्षम करेल आणि दोन-तीन वर्षांत आपण कोठे आहोत, याची तुलना होईल.”
हेही वाचा :Fresher विद्यार्थ्यांसाठी IT क्षेत्रात Job मिळवण्याचे मार्ग: संधी, तयारी आणि यशस्वी होण्यासाठीचे मंत्र
तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्सवर भर
मुख्यमंत्री म्हणाले, “AI मुळे प्रत्येक 3 महिन्यांनी तंत्रज्ञानाची नवी पिढी येत आहे. ‘लर्न, अनलर्न आणि रिलर्न’ हा आजचा मंत्र आहे. भारतीय विद्यार्थी विविध क्षेत्रांत आपली क्षमता सिद्ध करत आहेत.” त्यांनी स्टार्टअप्सच्या महत्त्वावरही भाष्य केले. “महाराष्ट्र आज स्टार्टअप कॅपिटल आहे. शासनाने ‘फंड ऑफ फंड्स’ तयार केला असून, त्याद्वारे शेकडो स्टार्टअप्स उभे राहिले आहेत. तरुणांना पोषक वातावरण देणे ही शासन आणि शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे. यामुळे रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडतील.”
महाराष्ट्राचे शैक्षणिक व्हिजन
महाराष्ट्र शासन आणि सिडकोच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 5 किमी परिसरात ही ‘एज्युसिटी’ उभारली जाणार आहे. यामुळे मुंबई आणि नवी मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळेल आणि महाराष्ट्राचे $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यात हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. कार्यक्रमाला आमदार अमित साटम, आमदार पराग अळवणी, NMIMS चे कुलगुरू डॉ. अमरीश पटेल, SVKM चे अध्यक्ष भूपेश पटेल, ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी, अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हँकी, इटलीचे कॉन्सुल जनरल वॉल्टर फेरारा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा: https://www.tv9marathi.com/international/air-india-dreamliner-bound-for-delhi-returns-to-hong-kong-after-technical-snag-1424783.html?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=TV9_Marathi